सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आता गरजेचे बनले आहे. याच कडक उन्हापासून वाचण्यासाठी काहीना काहीतरी प्रयत्न केले जातात. असे केल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. कडक उन्हात बाहेर पडताना काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
कडक उन्हापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी शहाळ्याचं पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदूळाची खीर, गुलकंद, कैरीचं पन्ह, लिंबू सरबत, जिऱ्याचं सरबत यांसारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. कडक उन्हात शक्य असेल तर बाहेर जाणं टाळावे. पण तरीही जायचे असेल, तर पाणी पिऊनच घराबाहेर पडावे. डोकं आणि डोळ्यांचं उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगलचा वापर करावा. सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लास्टिकची चप्पल वापर करणे टाळावे.
प्रचंड उष्णतेमुळे फ्रिज किंवा कूलरचे पाणी प्यावे असे वाटत असते. पण हे थंड पाणी प्यायचे टाळावे. यामुळे घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साधं अथवा माठातील पाणी पिणे उत्तम आहे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे. विशेषतः दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत घराबाहेर जाणे टाळावे. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूटाचा वापर करावा.
तसेच प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा चटका बसण्याची लक्षणं आहेत. उन्हाचा जास्त त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.